तुरीच्या डाळीचे मुटकुळे रेसीपी मराठी | Toordal Mutkule Recipe in Marathi
मुटकुळे हा पदार्थ खेड्यात जास्त प्रमाणात केला जातो
कारण खेड्यात शेतात गहु, बाजरी, ज्वारी, हरभरा, वाटाणा ही सर्व धान्ये पेरतात. शेती करणारे लोक खेड्यात जास्त प्रमाणात आढळल्यामुळे सर्व प्रकारची धान्ये त्यांना मिळतात व भाज्या महाग व शहराप्रमाणे प्रकार कमी असल्याने घरच्या धान्याचे पदार्थ भाज्यांऐवजी केले जातात. 'मुटकुळे' हा प्रकार पीठ भिजवून मुठीत दाबून करतात. त्यामुळे मुठे किंवा मुटकुळे हे नाव पडले. साधा चवदार, सोपा अशा मुटकुळ्याचे प्रकार बघू या.
साहित्य-
- तुरीची डाळ २ वाट्या,
- उडदाची डाळ अर्धी वाटी,
- चण्याची डाळ अर्धी वाटी,
- लसूण ४-५ पाकळ्या, ह्याची पेस्ट
- हिरव्या मिरच्या, ह्याची पेस्ट
- आले, ह्याची पेस्ट
- जिरे व ह्याची पेस्ट
- २ चमचे धणे पूड, ह्याची पेस्ट,
- तीळ,
- तिखट,
- मीठ,
- हळद,
- कोथिंबीर,
- हिंग, फोडणीचे साहित्य,
कृती-
- प्रथम सर्व डाळी भिजत टाकाव्यात.
- भिजल्यावर उपसून त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, जिरं, धणेपूड व थोडी कोथिंबीर टाकून साधारण जाडसर वाटावे.
- त्यात तिखट, मीठ, हळद मिसळावे.
- एका ताटात भाजलेले तीळ पसरवून ठेवावे व
- तयार डाळीच्या वाटलेल्या गोळ्याचे मुटकुळे करून ताटातील तिळात घोळावे.
- नंतर शिटी न लावता कुकरमध्ये किंवा मोदकपात्रात वाफवावे.
- कढईत तेलाची मोहरी, हिंगाची फोडणी करून हे मुटकुळे टाकून वरखाली करावेत.
- चांगली वाफ आणून परतून तेलात थोडे कडक बदामी रंगावर आणावेत.
- वरून कोथिंबीर टाकून कोणत्याही दही लावलेल्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
- डाळी भिजत न टाकता भरड्याचेही मुटकुळे करता येतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.